Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

पाऊस गायब, पिकं सुकतायत; पण शेतकऱ्यांची उमेद जिवंत!

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक : 

महाराष्ट्र: पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये शेतीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. कुठे महिनाभर, तर कुठे तब्बल ४५ दिवसांपासून पावसाचा थेंबही पडलेला नाही. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना शेतकऱ्यांना आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या संकटाच्या काळात फार्मर कप २०२६मधील शेतकरी गटांनी एकट्याने संकटाशी झुंज देण्याऐवजी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा आदर्श निर्माण केला आहे.




कुंभारगावात तुरीसाठी धावून आले ‘कुटुंब’

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुंभारगाव येथील कुटुंब महिला शेतकरी गटाने आपल्या नावाला साजेशी भूमिका बजावली. गटातील सारिकाताई सायकर यांनी प्रियंकाताई देशमुख यांच्या पाण्याअभावी अडचणीत आलेल्या तुरीच्या पिकाला सलग दोन दिवस पाणी दिले.


विशेष म्हणजे, संपूर्ण गटाने अवघ्या अर्ध्या तासात पाईप अंथरून सिंचनाची व्यवस्था उभी केली. त्यामुळे खुंटलेली तुरीची वाढ पुन्हा सुरू झाली आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला.


जालना जिल्ह्यात सहा एकर सोयाबीनला जीवदान,

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोडखा बुद्रुक येथेही शेतकरी एकजुटीचे उदाहरण पाहायला मिळाले. गोवर्धन बोडखे यांनी आपल्या कृषीकन्या शेतकरी गटातील दोन शेतकऱ्यांच्या जवळपास सहा एकर सोयाबीनला पाणी दिले. त्यामुळे पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असलेले पीक वाचवण्यात यश आले.


महिलांनी एकमेकींच्या शेतात पोहोचवले पाणी,

परतूर तालुक्यातील आंबा बागेश्वरी महिला शेतकरी गटात काही महिलांच्या शेतात पाण्याची उपलब्धता होती, तर चार महिलांच्या शेतात पाण्याचा थेंबही नव्हता. अशा परिस्थितीत गटातील महिलांनी एकत्र येत पाईप अंथरले, पाणी पोहोचवले आणि सुकत चाललेले सोयाबीन वाचवले.


“गटाच्या माध्यमातून मला बहिणी मिळाल्या,” या भावनेने व्यक्त झालेल्या महिलांच्या आनंदाश्रूंनी या एकजुटीची ताकद अधोरेखित केली.


मंठ्यात तुषार सिंचनातून सोयाबीनला आधार,

मंठा तालुक्यातील पाटोदा गावच्या कृषीकन्या महिला शेतकरी गटानेही एकमेकींच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला. तुषार सिंचनाचे पाईप एका शेतातून दुसऱ्या शेतात नेण्यात आले. परस्पर सहकार्यामुळे सर्व शेतकऱ्यांना वेळेत पाणी देता आले आणि सुकत चाललेले सोयाबीन वाचवण्यात यश आले.


नांदुरात महिलांची ‘पाणी वाचवा, पीक वाचवा’ मोहीम,

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील श्री गणेश महिला शेतकरी गटानेही तुषार सिंचनाचा आधार घेतला. एका शेतातून दुसऱ्या शेतात पाईप नेण्यापासून ते सिंचन यंत्रणा उभी करण्यापर्यंत प्रत्येक कामात महिला एकमेकींच्या मदतीला धावून आल्या.


पाणी कमी पडलं; पण माणुसकी कमी पडली नाही!

पावसाने साथ सोडली, पाण्याचे संकट वाढले आणि पिके सुकण्याची भीती निर्माण झाली. मात्र, या संकटात शेतकऱ्यांची माणुसकी आणि एकजूट कमी पडली नाही.


फार्मर कपमधील हे शेतकरी गट केवळ शेतीच्या प्रयोगांसाठी एकत्र आलेले समूह राहिलेले नाहीत; तर संकटाच्या काळात एकमेकांच्या शेतात पाणी पोहोचवणारे, एकमेकांचे पीक वाचवणारे आणि खऱ्या अर्थाने कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे गट बनले आहेत.


पाऊस कधी येईल, हे शेतकऱ्यांच्या हातात नाही; पण संकटात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे त्यांच्या हातात आहे—आणि हाच फार्मर कप २०२६चा खरा विजय आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad