राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
बुलढाणा / प्रतिनिधी: समाधान राठोड,
गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गोर सेना आणि बंजारा आरक्षण समितीच्या वतीने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सिंदखेडराजा परिसरातील विविध तांड्यांमध्ये ग्रामसभा घेऊन आरक्षणाच्या मागणीचे ठराव मंजूर करण्यात आले असून, १५ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
तांड्या-तांड्यांत ग्रामसभांचे ठराव,
सिंदखेडराजा तालुक्यातील नशिराबाद तांडा, नाईकनगर तांडा, वसंतनगर तांडा, दत्तापूर तांडा, खामगाव-खापरखुटी तांडा, चिंचोली तांडा, आडगावराजा तांडा, पिंपरखेड तांडा, सोनोशी तांडा, वरदर्डी तांडा आणि जयपूरपांगरी तांड्यासह परिसरातील विविध तांड्यांमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभांमध्ये आरक्षणाच्या मागणीसंदर्भात ठराव मंजूर करून ते गोरसेनेच्या कार्यकर्त्यांकडे जमा करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ऐतिहासिक पुराव्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप,
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी १९३७ चे हैदराबाद गॅझेट, सी.पी. बेरारमधील १८७१ चे पुरावे तसेच ३१ सप्टेंबर १९५२ च्या आदेशाचा दाखला देण्यात आला आहे. तसेच १८७१ च्या लोकूर समितीच्या अहवालातही यासंदर्भातील पुरावे असल्याचा दावा समितीने केला आहे.
न्यायमूर्ती तहलियानी समितीने नेमके काय काम केले आणि तिचा अहवाल काय होता, याबाबत राज्य सरकारकडून स्पष्टता दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे समाजात नाराजी वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
‘गल्ली ते दिल्ली’ आंदोलनाचा इशारा,
गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १५ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक पातळीवर मागणीची दखल न घेतल्यास ‘गल्ली ते दिल्ली’ तांडा-वस्ती ताला ठोक आंदोलन तसेच दिल्ली येथे ‘संसद मार्च’ काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन सिंदखेडराजाचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले. यावेळी बंजारा आरक्षण समितीचे सदस्य रोहिदास गणपत राठोड (नशिराबाद तांडा), गोरसेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. विजय आंबु राठोड यांच्यासह सकल बंजारा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

.jpg)
Post a Comment
0 Comments