आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
बुलढाणा: दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सह. बँकेची निवडणूक रविवार २३ ऑगस्ट रोजी होत असून, २१ संचालकांसाठी होणार्या या निवडणुकीतील १२ जागा यापुर्वीच अविरोध आलेल्या आहेत. उर्वरीत ९ जागांसाठी आता ही निवडणूक होत असून यात सहकार पॅनलच्या विरुध्द अजीतदादा पवार शेतकरी परीवर्तन यांच्यात ही लढत होत आहे.
बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सर्वसंमतीने बिनविरोध होणार, ही शक्यता संपुष्टात आल्यानंतर ही निवडणूक अटळ झाली होती. ९ जागांसाठी २३ उमेदवार आता रिंगणात आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ही निवडणूक गाजत अन् वाजत आहे. दोन्ही पॅनलने घेतलेल्या बैठकांनी सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. आरोप-प्रत्यारोप यांच्या पैâरी झडल्या. अगदी उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांना या जिल्हास्तरीय निवडणुकीसाठी व्हीडिओ जारी करावा लागला. तर इकडे सहकार पॅनलच्या सर्वच नेत्यांनी व्हीडिओ जारी केले.
जालना, नांदेडसह बाजूच्या जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये सर्वसंमतीचे चित्र पाहायला मिळाले.पण बुलढाणा जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर येथेही बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या. सुरुवातीला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवडून आले. उर्वरित १९ जागा बिनविरोध करण्यासाठी पुन्हा खामगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी झालेल्या अर्ज माघारीनंतर आणखी १० जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे एकूण १२ संचालक बिनविरोध निवडून आले.
अविरोध निवडून आलेल्यांमध्ये कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर व आ.श्वेताताई महाले यांचे वडील अंकुशराव पाटील, आ.संजय गायकवाड (शिवसेना शिंदे), जालिंदर बुधवंत (शिवसेना उबाठा), प्रसेनजित पाटील (राकाँ. पवार गट), पांडुरंग पाटील (शेगाव), राजेश देशमुख (नांदुरा), दिनेश काळणे (शेगाव), कावेरी सोनसळे (देऊळगाव राजा) आणि मयूर बाहेकर (बुलढाणा) यांचा समावेश आहे.
एकूण २१ संचालकांपैकी १२ संचालक सर्वपक्षीय एकजुटीतून बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी वेगळी भूमिका घेतल्याने उर्वरित ९ जागांचा तिढा सुटला नाही. आता या ९ जागांसाठी आ. मनोज कायंदे यांनी स्व.अजीतदादा पवार शेतकरी परीवर्तन पॅनलच्या माध्यमातून दंड थोपटले आहे.
सहकार पॅनलने १२ जागा बिनविरोध करून आधीच आपले बहुमत निश्चित केले असले, तरी उर्वरित काही जागांसाठी होणार्या निवडणुकीमुळे सर्वसंमतीच्या धोरणाला छेद गेला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला सिंदखेडराजा मतदारसंघातील राजकारणाची किनारही आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे मनोज कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. तिरंगी झालेल्या या निवडणुकीत मनोज कायंदे विजयी झाले होते.
महाराष्ट्र शासन, राज्य सहकारी बँक तसेच अजीतदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे बँकेला राज्य शासनाच्या हमीवर ३०० कोटी रुपयांचे सवलतीचे कर्ज मिळाले. याशिवाय राज्य सरकार, केंद्र सरकार आणि नाबार्डकडून सुमारे २०० कोटी रुपयांचे पुनर्भांडवलीकरण कर्ज उपलब्ध झाले. यामुळे बँकेचा ताळेबंद सुधारला. खोल आर्थिक गर्तेत सापडलेल्या जिल्हा बँकेला प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रशासक तथा कार्यकारी अधिकारी डॉ. अशोकराव खरात यांनी २०१६ पासून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. बँकेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. कठोर आर्थिक शिस्त व नियोजनबद्ध कारभारामुळे बँकेला केवळ तोट्यातूनच बाहेर काढण्यात आले नाही, तर ती तब्बल २३ कोटी ५५ लाख रुपयांच्या नफ्यात आली. यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त झाली असून, बँकेचे पुनरुज्जीवन झाले आहे. आता शेतकरी कर्जमाफीमुळे बँकेचा ताळेबंद आणखी सुस्थितीत आणि मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे २३ ऑगस्ट रोजी होणार्या मतदानात उर्वरित ९ जागांवर कोण बाजी मारणार? हे पाहणेही तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे व याकडेच जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments