आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य विभागात एका दुर्दैवी घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मेहकर तालुक्यातील मांडवा फॉरेस्ट येथील आपला दवाखाना येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संदीप प्रकाशराव हाडे यांनी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, वरिष्ठांच्या जाचामुळे आणि कामाच्या प्रचंड ताणामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप आता करण्यात येत आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी डॉ. संदीप हाडे यांनी आपल्या दवाखान्याच्या आवारात उत्साहात ध्वजारोहण केले होते. झेंडावंदन कार्यक्रमानंतर ते वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे या आपल्या मूळगावी रवाना झाले. गावी पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या शेतात जाऊन गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ही घटना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात घडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
या आत्महत्येमागे नेमके काय कारण असावे, याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच आपला दवाखाना वैद्यकीय अधिकारी संघटनेने धक्कादायक खुलासे केले आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नॅशनल क्वालिटी इन्शुरन्स स्टँडर्ड (NQAS) च्या मूल्यांकनाची तयारी करण्यासाठी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रचंड दबाव टाकला जात होता. केंद्रात निकषानुसार आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानाही मूल्यांकनासाठी तयारी पूर्ण करण्याचा तगादा वरिष्ठांनी लावला होता. त्यातच मनुष्यबळाची कमतरता असल्याने कामाचा ताण असह्य झाला होता. याच तणावातून डॉ. संदीप हाडे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या गंभीर आरोपानंतर आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडले यांनी एक विशेष चौकशी समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती CHO संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉ. विशाल बाजड यांनी दिली आहे. एकीकडे आरोग्य सुविधांच्या नावाखाली प्रशासकीय पातळीवर होत असलेला दबाव आणि दुसरीकडे कार्यरत कर्मचाऱ्यांची होणारी ओढाताण यामुळे हा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
एका जबाबदार पदावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने अशा प्रकारे आयुष्य संपवणे ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. वरिष्ठांचा दबाव आणि कामाचा ताण हे घटक एखाद्याच्या जीवावर बेतत असतील, तर ही बाब आरोग्य विभागासाठी अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल.

Post a Comment
0 Comments