आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
वर्धा : स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहावर हिंगणघाट शहरात घडलेल्या भीषण अपघाताने दुःखाची छाया पसरली. बस स्थानक ते आंबेडकर शाळा मार्गावर दुचाकीवरून तिघी विद्यार्थिनी प्रवास करत असताना अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचा ताबा सुटला. तिघीही रस्त्यावर कोसळल्या आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सुमारे ९.४५ ते १० वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसबा जावेद शेख (१७), आरोही अनुप चौरे (१६, रा. स्वीपर कॉलनी) आणि समृद्धी रूपक ठामसे (१५) या तिघी दुचाकी क्रमांक एमएच ३२ एडब्ल्यू ५७७९ वरून आंबेडकर चौकाकडून आंबेडकर शाळेच्या दिशेने जात होत्या.
साखरकर कॉम्प्लेक्सजवळ अचानक कुत्रा दुचाकीसमोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे तिन्ही विद्यार्थिनी रस्त्यावर पडल्या. याचवेळी हिंगणघाटकडून नागपूरच्या दिशेने जाणारी संगम ट्रॅव्हल्सची एमएच ४९ एटी ३४३८ क्रमांकाची बस तेथून जात होती. बसच्या मागील चाकाखाली तिघी आल्याने गंभीर अपघात झाला आणि तिन्हींचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तिन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातातील दुचाकी आणि ट्रॅव्हल्स बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या दुर्घटनेची माहिती शहरात पसरताच मृत विद्यार्थिनींचे कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. परिस्थिती लक्षात घेता रुग्णालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला.
मृतांपैकी मिसबा आणि समृद्धी या आंबेडकर ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेत अकरावीच्या वर्गात शिकत होत्या, तर आरोही ही मोहता विद्यालयाची विद्यार्थिनी होती. तिघी मैत्रिणी असल्याने त्या एकत्र दुचाकीवरून प्रवास करत होत्या.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments