Type Here to Get Search Results !

आदर्श ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पोलीस कोठडी लाचखोरीतील 'मुख्य सूत्रधार' पती अद्यापही पसार,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :


वाशिम: ढोरखेडा (ता. मालेगाव) ग्रामपंचायतीच्या नाली बांधकामाचे बिल मंजूर करण्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरपंच सुनीता दत्तात्रेय मिटकरी यांना ४ जून रोजी रंगेहात अटक केली होती. याप्रकरणी ५ जून रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या लाचखोरीतील मुख्य सूत्रधार मानले जाणारे सरपंच पती दत्तात्रेय (बबन) मिटकरी हे कारवाईनंतर पसार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.




तक्रारदार बांधकाम कंत्राटदाराने ढोरखेडा येथे नाली बांधकामाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आणि त्यावरील हस्तांतरण पावतीवर स्वाक्षरी व शिक्का देण्यासाठी सरपंच सुनीता मिटकरी व त्यांचे पती बबन मिटकरी यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीवरून एसीबीने पडताळणी केली असता, २५ हजार रुपये लाच घेताना सरपंच सुनीता मिटकरी यांना रंगेहात पकडण्यात आले. मात्र, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला पती बबन मिटकरी गावांमधून पसार झाले. एसीबीचे एक विशेष पथक सध्या त्याचा शोध घेत आहे, अशी माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांनी दिली.


ढोरखेडा ही ग्रामपंचायत पंचक्रोशीत 'आदर्श' म्हणून ओळखली जाते. मात्र, सरपंचांवरच लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या सुनीता मिटकरी यांनी पतीच्या सांगण्यावरून किंवा प्रभावाखाली हे कृत्य केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली असून, या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.


ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिमचे पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी आणि पोलीस निरीक्षक अलका मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद मारकंडे, योगिता गायकवाड, योगेश खोटे, पोलीस शिपाई महेश परमेश्वरे आणि नावेद शेख यांच्या पथकाने केली. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad