आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
अध्यापनाची जबाबदारी सांभाळत सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रिसोड तालुक्यातील नऊ युवा शिक्षकांनी केंद्रप्रमुख पदाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून पदोन्नती मिळवली आहे. या उल्लेखनीय यशामुळे तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
रिसोड पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेत केंद्रप्रमुख पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी यश संपादन केले.
केंद्रप्रमुख पदासाठी सन २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २०२५ मध्ये परीक्षा घेण्यात आली. टीईटी पात्र शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेली ही परीक्षा २०० गुणांची होती. गुणवत्तेनुसार (मेरिट ) उमेदवारांची निवड करण्यात आली असून २०२६ मध्ये निकाल जाहीर करण्यात आला.या परीक्षेत यश मिळवणाऱ्या शिक्षकांमध्ये उमाकांत काष्टे, साईनाथ शिंदे, अमोल बोडखे, विनोद झनक, सचिन राऊत, प्रवीण सदार, प्रशांत मोरे, अमरजीत खिल्लारी आणि वैभव खिल्लारी यांचा समावेश आहे.
या सर्व शिक्षकांनी अध्यापनाची जबाबदारी सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी करून मिळविलेल्या यशामुळे इतर शिक्षकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण विभाग, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नऊ शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि त्यानंतर संपादन केलेले लक्षवेधी यश हे निश्चितपणे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
Post a Comment
0 Comments