आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील,
परभणी : जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांनी पक्ष नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांच्या समर्थकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. दोन वेळा आमदार , तीन वेळा खासदार आणि पक्षाचे उपनेते म्हणून कार्यरत असतानाही खासदार संजय जाधव यांच्यावर पक्ष नेतृत्व अविश्वास का दाखवत आहे , असा थेट सवाल या बैठकीत समर्थकांनी उपस्थित केला.
पक्षांतराच्या चर्चा होत्या सुरु,
मागील दोन महिन्यांपासून खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात राजकारण बदलत आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जाधव समर्थक असलेले जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवण्यात आले आणि विष्णू मुरकुटे यांच्यावर नवीन जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. या निर्णयामुळे जाधव समर्थक अधिक आक्रमक झाले. याचा परिणाम म्हणून ब्याऐंशी पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठवून संजय जाधव यांच्या पाठीशी उभे असल्याचा स्पष्ट संदेश दिला.
कार्यकर्त्यांनी व्यक्त केली खंत,
पाथरी विधानसभा मतदारसंघात जाधव समर्थक शिवसैनिकांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत एकतर्फी पक्षांतराची चर्चा सुरू करून खासदारांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न होत असल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने खासदार जाधव आणि कार्यकर्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला. गंगाखेड विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या व्यक्तीला जिल्हाप्रमुख पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप आहे. परभणी तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले , विधानसभा प्रमुख डॉ राम शिंदे आणि युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बाराहत्ते यांनी भाषणात स्पष्ट केले की , आमच्यासाठी मातोश्री , पक्ष आणि नेतृत्व म्हणजे केवळ खासदार संजय जाधव आहेत.
विश्वासात न घेता घेतल्या बैठका,
संजय राऊत यांच्यानंतर पक्षाचे उपनेते म्हणून संजय जाधव यांनी निष्ठेने पक्षाची बाजू मांडली आणि विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. असे असतानाही पक्षाकडून त्यांच्यावर अविश्वास दाखवला जात असल्याने कार्यकर्ते दुखावले आहेत. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांबाबत खासदार जाधव यांना विश्वासात न घेता त्यांच्या विरोधात बैठका घेतल्या जात असल्याचा आरोप बैठकीत झाला. आगामी काळात खासदार संजय जाधव जो निर्णय घेतील , त्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीला पाथरी मतदारसंघातील अनेक आजी माजी सरपंच आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments