आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक :
खामगावमधील संशयास्पद नोंदणीवर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा,
खामगाव: बांधकाम कामगार योजनेमध्ये खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांना डावलून फक्त विशिष्ट राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि चुकीच्या लोकांना लाभ दिला जात असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेनेने जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना घेराव घातला. शिवसेना जिल्हाप्रमुख **संतोष डिवरे यांच्या नेतृत्वाखाली २० मे २०२६ रोजी जिल्हा सहकारी कामगार अधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा नेण्यात आला होता. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रशासकीय अनागोंदी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
शिवसेनेने आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांसमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. संपूर्ण महाराष्ट्रात बांधकाम कामगार मंडळ, मुंबई यांची अधिकृत साईट बंद असताना, केवळ खामगावमध्येच कामगार मंडळाची साईट कशी काय सुरू आहे? असा रोखठोक सवाल उपस्थित करण्यात आला. ठराविक अधिकारी आणि नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनाच या योजनेचा फायदा मिळवून दिला जात असून, इतर पक्षांशी संबंधित किंवा सामान्य कुटुंबातील खरा लाभार्थी मात्र योजनेपासून वंचित आहे.तसेच, सामान्य नागरिकांनी वारंवार ऑनलाईन अर्ज करूनही त्रुटी काढून ते नामंजूर केले जातात. मात्र, एजंटच्या माध्यमातून आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'चिरिमिरी' (लाच) दिल्यास कामे तात्काळ होतात. जुन्या लाभार्थ्यांचे स्कॉलरशिप आणि हॉस्पिटलचे बिल मंजूर करण्यासाठीही पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेने केला आहे. सर्वसामान्य कामगारांसाठी असलेल्या जाचक अटी तातडीने शिथिल करण्यात याव्यात.ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कामगार मंडळाची साईट २४ तास खुली ठेवण्यात यावी.कार्यालयातील एजंटगिरी आणि लाचखोरी तात्काळ बंद करून पारदर्शक कारभार करावा. बुलढाणा जिल्हा ऑफिस अंतर्गत होणारी कामगार नोंदणी लवकरात लवकर पूर्ववत सुरू करावी.
या आंदोलनात शिवसेना नेते अमोल अंधारे, खामगाव तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शेगाव तालुकाप्रमुख रामा पाटील थारकर, बांधकाम कामगार विदर्भ प्रमुख सचिन विटे, बांधकाम कामगार जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर पाटील फरफट, पिंटू पाटील धोरण, उपतालुकाप्रमुख मंगेश काळे, परमेश्वर घोरपडे (जिल्हा उपप्रमुख, बां.का.सेना), शुभम वावरे (जिल्हा सचिव, बां.का.सेना), मंगेश वानखडे (तालुकाप्रमुख, बां.का.सेना), संतोष पवार (शेगाव तालुकाप्रमुख, बां.का.सेना) यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि संतप्त बांधकाम कामगार उपस्थित होते.
योजना ही सरकारची आहे, एखाद्या राजकीय पक्षाची घरची मालमत्ता नाही. जर प्रशासनाने एजंटगिरी बंद केली नाही आणि खऱ्या लाभार्थ्यांना न्याय दिला नाही, तर सर्व वंचित कामगारांना सोबत घेऊन कामगार मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि जिल्हा कार्यालयाविरुद्ध तीव्र मोर्चा व ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल.असे संतोष डिवरे (जिल्हाप्रमुख, शिवसेना) यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments