आंतरराष्ट्रीय,
महाराष्ट्र,
क्राईम,
पत्रकासंघ,
खेळ,
मुख्यसंपादक - देविदास पाटील वायाळ
विदर्भ -
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणांगणात उतरण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र प्रदेश स्तरावर मोठा गेम प्लॅन आखला आहे. विदर्भातील संघटनात्मक बांधणीला धार देण्यासाठी भाजपने आपल्या अनुभवी आणि आक्रमक नेत्यांचे असाइनमेंट फिक्स केले असून, जिल्हा प्रभारींच्या नावांची घोषणा होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणापासून ते पूर्व विदर्भातील गोंदियापर्यंत भाजपने आपली पॉवरफुल फळी मैदानात उतरवली आहे.
भाजपने विदर्भाच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच बुलढाणा जिल्ह्याची धुरा जयंत देहनकर यांच्याकडे सोपवून आपला ॲक्शन मोड स्पष्ट केला आहे. खामगावसाठी श्रीमती निवेदिता चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अकोला शहरात नितीन भुतडा आणि अकोला ग्रामीणमध्ये प्रवीण पोटे या अनुभवी नेत्यांना टार्गेट पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पोटे यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागात भाजपचा ग्राफ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमरावती विभागाच्या राजकारणात आपला होल्ड मजबूत करण्यासाठी भाजपने मोठी खेळी खेळली आहे. अमरावती शहरासाठी आक्रमक नेते संजय कुटे यांची निवड करून पक्षाने विरोधकांना कडक मेसेज दिला आहे. अमरावती ग्रामीण (मोर्शी) साठी अविनाश देव आणि मेळघाटसाठी विजयराव जाधव यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वाशिम जिल्ह्यासाठी रणधीर सावरकर यांच्यावर विश्वास टाकला आहे. यवतमाळमध्ये तरुण तडफदार नेते सुमित वानखेडे यांच्याकडे जबाबदारी सोपवून भाजपने तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्लॅन तयार केला आहे. पुसदमध्ये दिनेश सूर्यवंशी आपली ताकद दाखवणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शहराची जबाबदारी परिणय फुके या विश्वासातील नेत्याकडे देण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये रामटेकसाठी राजीव पोटदार आणि काटोलसाठी सुधाकर कोहळे यांना फिल्डिंग लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वर्धा जिल्ह्यासाठी संजय भेंडे, तर भंडारा जिल्ह्यासाठी माजी खासदार रामदास तडस यांची निवड करून भाजपने अनुभवाला प्राधान्य दिले आहे. गोंदियामध्ये आमदार प्रविण दटके यांची नियुक्ती हा भाजपचा मोठा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
विदर्भातील ही नवी टीम केवळ नावापुरती नसून, प्रत्येक नेत्याला विशिष्ट परफॉर्मन्स देण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. भाजपच्या या नव्या स्ट्रॅटेजी मुळे विरोधकांच्या गोटात टेन्शन निर्माण होऊ शकते. 'मिशन विदर्भ' फत्ते करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून, आता या नेत्यांचा धडाका ग्राऊंड लेव्हलवर कसा दिसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments