नवराष्ट्र मराठी,
नागपूर प्रीतिनिधी: नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी गावालगत काळजाचा ठोका चुकवणारी दुर्दैवी घटना घडली. जनावरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा वीज कोसळून मृत्यू झाला. या घटनेने तिष्टी गावावर शोककळा पसरली आहे.
टिबुराज राजेंद्र कानफाडे (६५) आणि लक्ष्मण घनश्याम कानफाडे (५३) हे दोघे भाऊ जनावरे चारण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान, अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाल्याने त्यांनी सुरक्षिततेसाठी ‘माता-माय’ मंदिरात आश्रय घेतला.
मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. मंदिर परिसरातच अचानक वीज कोसळली. या वज्राघातात दोन्ही भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी परतले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र, अंधारामुळे रात्री शोधमोहीम थांबवावी लागली. सकाळी ग्रामस्थांनी पुन्हा शोध घेतला असता मंदिरात दोन्ही भावांचे मृतदेह आढळून आले.
या घटनेने कानफाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा अशा दुर्दैवी पद्धतीने अंत झाल्याने गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
संपादक : देविदास वायाळ


Post a Comment
0 Comments