Type Here to Get Search Results !

आळंदमध्ये कुऱ्हाड-खुरप्याने रक्तरंजित हल्ला! शेत हद्दीच्या वादातून दोन शेतकरी जखमी, एकमेकांवर गुन्हे दाखल,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

 देऊळगावराजा:  तालुक्यातील आळंद येथील शेतशिवारात शेताच्या हद्दीवरून झालेल्या वादाने चांगलेच उग्र रूप धारण केले. या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून, घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करत पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. एका फिर्यादीत कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या फिर्यादीत खुरप्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या परस्परविरोधी तक्रारींची दखल घेत देऊळगाव राजा पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.पहिल्या तक्रारीनुसार, आळंद येथील रहिवासी सुधाकर लिंबाजी खार्डे (वय ५३) हे २३ जुलै रोजी दुपारी सुमारे एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गेले असता, शेतात कोणीतरी दगडांचे ढिगारे टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शेजारी असलेल्या सारंगधर दशरथ खार्डे यांच्याकडे विचारणा केली असता दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, सारंगधर खार्डे यांनी कुऱ्हाडीने डाव्या पायाच्या नळीवर वार करून सुधाकर खार्डे यांना जखमी केल्याचा तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.




या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सारंगधर दशरथ खार्डे (वय ३०) यांनीही पोलिसांत उलट तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, शेतातील कपाशीचे पीक का उपटण्यात आले, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून सुधाकर खार्डे यांनी शिवीगाळ करत हातातील धारदार खुरप्याने त्यांच्या दोन्ही पायांवर, हातावर तसेच डाव्या बाजूच्या छातीवर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच खुरप्याच्या दांड्याने पाठीवर मारहाण करून जखमी केल्याचा आणि भविष्यात शेतात एकटे आढळल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. या फिर्यादीवरूनही पोलिसांनी संबंधित कलमांखाली स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे.


दोन्ही गुन्ह्यांची नोंद वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमुळे आळंद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळावरील परिस्थिती, दोन्ही जखमींचे वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे नेमका प्रकार कसा घडला, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad