आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेडवर हुबेहूब स्वाक्षरी करून तब्बल ४ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी बनावट प्रशासकीय मान्यता (प्रमा) आदेश तयार केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित आशिष पिपरे याला रविवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेला आशिष पिपरे हा चामोर्शी नगरपंचायतीतील स्वीकृत नगरसेवक असून त्याची पत्नी भाजपची नगरसेविका आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी त्याची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली फसवणुकीचे आरोप त्याच्यावर झाले होते.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून मोबाईल कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि बनावट कागदपत्रांची संपूर्ण साखळी तपासली जात आहे. चौकशीतून आणखी काही जणांचा सहभाग समोर येण्याची शक्यता असल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आशिष पिपरे याने एका माजी राज्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक (पीए) म्हणूनही काम केले होते. त्या राजकीय ओळखीचा वापर करून जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीतील विकासकामांसाठी बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
पिपरेच्या अटकेनंतर तपासाला अधिक वेग आला असून बनावट लेटरहेड, जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी, प्रशासकीय मंजुरी आदेशांची निर्मिती, त्यांचा वापर आणि त्यामागील आर्थिक व्यवहार यांचा सखोल तपास सुरू आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे काही विकासकामांसाठी बनावट आदेश तयार करण्यात आले होते का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांसारख्या सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाचा आणि स्वाक्षरीचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या रॅकेटमधील इतर आरोपी, आर्थिक व्यवहार आणि मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments