आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
भोकरदन: भोकरदन शहर आणि तालुक्यात दिवसाढवळ्या घडणाऱ्या घरफोड्यांच्या मालिकेमुळे पोलिसांच्या गस्तीची परिणामकारकता आणि गुन्हेगारांवरील वचक यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरटे भरदिवसा कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करत असताना पोलिस यंत्रणा नेमकी काय करत होती, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रतापनगर परिसरातील शिक्षक दांपत्याच्या घरात भरदिवसा घरफोडी झाल्यानंतर त्याच दिवशी कुकडी येथेही दोन घरांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे चोरट्यांनी पोलिसांनाच उघड आव्हान दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरात नियमित गस्त असल्याचा दावा केला जातो; मात्र प्रत्यक्षात चोरटे बिनधास्तपणे घरफोड्या करून पसार होत आहेत. त्यामुळे पोलिसांची गस्त केवळ कागदोपत्रीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्हेगार निर्धास्त आणि नागरिक भयभीत अशी परिस्थिती निर्माण होणे हे कायदा-सुव्यवस्थेसाठी धोक्याचे संकेत मानले जात आहेत.
प्रतापनगर येथील घरफोडीनंतर गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून, त्यामुळे तपास प्रक्रियेबाबतही शंका व्यक्त केल्या जात आहेत. दुसरीकडे कुकडी येथील प्रकरणात तत्काळ कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकाच तालुक्यात वेगवेगळे निकष का लागू केले जात आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात सीसीटीव्ही बसवणे, स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी नागरिकांनीच उचलणे आणि घटना घडल्यानंतर पोलिसांनी केवळ पंचनामा करण्यापुरती भूमिका घेणे, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
भोकरदन पोलिसांनी आता केवळ गुन्हा दाखल करण्यापुरते मर्यादित न राहता, दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांचा तातडीने छडा लावून त्यांना जेरबंद करणे, संवेदनशील भागात प्रभावी गस्त वाढवणे आणि गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा वाढत्या घरफोड्या आणि नागरिकांमधील भीती याची संपूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनावरच येईल, अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments