आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
मेहकर तालुक्यातील परतापूर येथे एका घरात महिलेची सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान चाचणी करीत असतानाच पीसीपीएनडीटी पथकाने धाड घालून एका बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले. २७ जूनच्या दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. यावेळी सोनोग्राफी मशीन व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी घरमालकासह डॉक्टरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अनिल रामदास सोनुने असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. मेहकर तालुक्यातील परतापूर येथे रसाळ नावाच्या व्यक्तीच्या घरात बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना मिळाली. त्यांनी तातडीने पीसीपीएनडीटी पथकाला अलर्ट केले. २७ जून रोजी सापळा रचण्यात आला.
मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता हिवसे, मेहकर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, एपीआय बिराजे, राठोड, लक्ष्मण कटक, शिवनकर, संदीप भोंडाने, मोहंमद परसुवाले, केशव अवचार, सरकटे तसेच रुग्णालयाच्या अधिपरिचारिका मंगला वायाळ, प्रशांत बोरे, वरिष्ठ लिपिक वायाळ यांनी परतापूर येथे रसाळ याच्या घरावर २७ जूनच्या सकाळपासूनच पाळत ठेवली.
बोगस डॉक्टर अनिल सोनुने हा दुपारी अडीच तीनच्या सुमारास रसाळच्या घरात गर्भपाताचे साहित्यही सोबत चकुणालाही कळणार नाही, अशा पद्धतीने हा बोगस डॉक्टर सोनोग्राफी मशीन सोबत बाळगत होता. याशिवाय गर्भपाताचेही साहित्य सोबतच ठेवायचा. आज बोगस डॉक्टर सोनुने याने गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपाताचीही तयारी ठेवली होती. सोबत औषधे आणि इन्जेक्शन नेले होते. हे साहित्यदेखील पथकाने जप्त केले.
घरात शिरल्यानंतर त्याने महिलेच्या गर्भाचे सोनोग्राफी मशीनद्वारे लिंग निदान सुरू केले. त्याचक्षणी छापा मारून डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले. डॉक्टरसह घरमालक रसाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
गर्भलिंग निदानाचे प्रकार वाढले मेहकर तालुका हा मागील अनेक वर्षांपासून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी कुप्रसिद्ध ठरू लागला आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने येथे अनेक गैरप्रकार सर्रासपणे सुरू असतात. यापूर्वीही मेहकर येथे झालेल्या कारवाईने राज्यभर खळबळ उडाली होती. डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गतही गर्भलिंग निदान करण्याच्या तयारीत असलेल्यांना पकडण्यात आले होते, तर वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील कारवाईत एक आरोपी डोणगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. आजची कारवाई गर्भलिंग निदानाच्या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या घटनेमुळे समाजात अशा गैरप्रकारांविरोधात जनजागृती वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनतेने मदत करावी. आपला सहभाग द्यावा. कुठे गर्भलिंग निदान चाचणी होत असेल अथवा स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार घडत असतील तर त्याची तातडीने माहिती द्यावी म्हणजे कारवाई करता येईल. हे प्रकार रोखून आपल्याला मुलींचे प्रमाण वाढविण्यास मदत होईल.
- डॉ. दत्तात्रय बिराजदार जिल्हा शल्यचिकित्सक

Post a Comment
0 Comments