Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'सामाजिक क्षेत्र वॉर रूम' बैठक.

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक :

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'सामाजिक क्षेत्र वॉर रूम' बैठक पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत पायाभूत आरोग्य सुविधा बळकटीकरण, प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन, नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी, एचपीव्ही लसीकरण मोहीम आदींसह विविध प्रलंबित कामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.



मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश,

राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील आरोग्यसेवा परिणामकारक, दर्जेदार आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत प्रधानमंत्री आयुष्मान आरोग्य मंदिर, क्रिटिकल केअर ब्लॉक आणि प्रयोगशाळांच्या उभारणीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


निधी वेळेत खर्च व्हावा,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात दर्जेदार व सहज उपलब्ध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा विशेष भर आहे. यासाठी तमिळनाडूसह विविध राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. केंद्र शासनाकडून मिळणारा निधी निर्धारित वेळेत खर्च होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आयुष्मान आरोग्य मंदिर उभारणे, क्रिटिकल केअर ब्लॉक व एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांची कामे वेगाने करण्यासाठी लक्ष घालावे. सर्व जिल्ह्यांनी आता निश्चित केलेल्या वेळापत्रकात काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. प्रलंबित प्रकल्पांमध्ये विभागांमधील समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी शासन म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.


शासनाच्या आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि चांगले ब्रँडिंग असावे, मॉड्यूलर तंत्रज्ञानामुळे दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण होऊ शकत असल्याने अधिकाऱ्यांनी कल्पकतेने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.


कामांना गती द्यावी,

पुण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आलेल्या सकारात्मक बदलाचा आदर्श घेत अशा चांगल्या उपक्रमांचा राज्यातील इतर ठिकाणीही अवलंब व्हायला हवा. नागरिकांना शासकीय आरोग्य व्यवस्थेमध्ये गुणवत्ता जाणवली पाहिजे, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारून लक्ष घालावे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीमधील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.


१० लाख मुलींच्या लशीकरणाचे उद्धीष्ट,

सर्व्हायकल कर्करोग प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राला जवळपास 10 लाख मुलींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जिल्हास्तरावर पालकांची संमती घेऊन व्यापक जनजागृती मोहीम राबवावी आणि लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. राज्यात नवीन 13 वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या महाविद्यालयांच्या उभारणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामे वेगाने पूर्ण होतील, याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.


🕐12.50pm | 18-5-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | १२.५० वा. । १८-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई 

नवराष्ट्र मराठी,

Post a Comment

0 Comments

Top Post Ad