आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
क्राईम,
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
परभणी: आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या कामांसाठीही वेळ मिळणे कठीण झाले असताना, परभणी जिल्ह्यातील एका प्राध्यापकाने आपल्या आईच्या अस्थी विसर्जनासाठी पायी तीर्थयात्रा सुरू करून मातृभक्तीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. कडक उन्हात आणि 43 अंशांपेक्षा अधिक तापमानात सुरू असलेल्या या प्रवासाची सर्वत्र चर्चा होत आहे.
सोनपेठ तालुक्यातील आवलगाव येथील रहिवासी रुक्मिणीबाई नारायणराव धोंडगे यांचे 14 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव तथा जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील प्राध्यापक पंढरीनाथ धोंडगे यांनी आईच्या अस्थी पंढरपूर, आळंदी, तुळापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, काशी, प्रयागराज आणि गया या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये विसर्जित करण्याचा संकल्प केला.
विशेष म्हणजे, या तीर्थयात्रेसाठी वाहनाचा वापर न करता पायी जाण्याचा निर्धार त्यांनी केला. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी कडक उन्हाळा व आगामी पावसाळा लक्षात घेऊन त्यांना वाहनाने जाण्याचा सल्ला दिला. मात्र, पंढरपूर व आळंदीपर्यंत तरी पायी जाण्याच्या आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले. अखेर कुटुंबीयांनीही त्यांच्या निर्धाराला मान्यता दिली.
6 जून रोजी प्रा. धोंडगे यांनी आवलगाव येथून आईच्या अस्थी सोबत घेऊन पंढरपूरकडे पायी प्रवास सुरू केला. दररोज 35 ते 40 किलोमीटर अंतर पार करत ते गावागावातील मंदिरांमध्ये मुक्काम करत आहेत. आतापर्यंत अंबेजोगाई, युसूफवडगाव (जि. बीड), येरमाळा (जि. धाराशिव), खांडवी आणि उपळाई बुद्रुक (जि. सोलापूर) येथे त्यांचे मुक्काम झाले असून पुढे आष्टी व शेटफळा येथे मुक्काम करून ते पंढरपूरला पोहोचणार आहेत.
शुक्रवारी पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत स्नान करून आईच्या अस्थींचे विसर्जन करण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यानंतर ते आळंदी, तुळापूर, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे जाणार असून पुढील सुट्टीत काशी, प्रयागराज आणि गया येथेही अस्थी विसर्जनाचा विधी पार पाडणार असल्याचे समजते. या प्रवासात अमोल धोंडगे, राधाकिशन गवळी, व्यंकटी जगाडे आणि हनुमान धोंडगे हे भोजन, चहापान व अन्य व्यवस्थेसाठी मदत करत असून दररोज त्यापैकी एक जण प्रा. धोंडगे यांच्यासोबत काही अंतर पायी चालत आहे.
प्रा. धोंडगे यांचे मित्र व्यंकटी जगाडे म्हणाले, पंढरीनाथ धोंडगे एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यांच्या या प्रवासामुळे आम्हालाही पायी पंढरपूर वारीचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे. मातृभक्ती, श्रद्धा आणि दृढनिश्चय यांचा संगम असलेली ही पायी तीर्थयात्रा सध्या परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
दरम्यान, याबाबत प्रा. पंढरीनाथ धोंडगे म्हणाले, आई-वडील आपल्या आयुष्यासाठी असंख्य कष्ट सहन करतात. त्यांचे ऋण कधीही फेडता येत नाही. आईवरील अपार प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञतेतूनच मी विविध तीर्थक्षेत्रांवर पायी जाऊन तिच्या अस्थींचे विधीवत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
.
navrashtramarathinews.in.net


Post a Comment
0 Comments