आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक :
जात-पात विरघळली, मानवता जिंकली! वडनेर भोलजीच्या तरुणांनी दिला सामाजिक सलोख्याचा ऐतिहासिक संदेश.
'हाच शिव-फुले-शाहु-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र';
तीन वेगवेगळ्या समाजातील वर्गमित्रांच्या लग्नाची निघाली एकत्र वरात!
आजही देशाच्या अनेक भागांत जातीय द्वेषातून दलितांच्या वरातींवर हल्ले होण्याच्या घटना घडत असताना, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाने मात्र देशासमोर सामाजिक समतेचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. एकाच वर्गात शिकलेल्या, वेगवेगळ्या समाजाच्या तीन वर्गमित्रांचा विवाह मुहूर्त एकाच दिवशी असल्याने, गावात जात-पात आणि धर्माच्या भिंती गळून पडल्याचे आणि केवळ मानवतेचा उत्सव साजरा झाल्याचे अभूतपूर्व चित्र पाहायला मिळाले.
तिन्ही कुटुंबात उत्सहाचे वातावरण,
वैशाख कृष्ण १२, बुधवार दिनांक १३ मे २०२६ रोजी हा अनोखा सोहळा पार पडला. बौद्ध समाजातील राहुल प्रकाश इंगळे (पुणे येथील नामांकित कंपनीत कार्यरत), माळी समाजातील वैभव सदाशिव जुमडे (संचालक, ओम इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर) आणि तेली समाजातील धीरज गोरे (इंडियन आर्मीचे जवान) हे तिघेही गावातील शाळेत एकाच वर्गात शिकले आणि लहानाचे मोठे झाले. योगायोगाने तिघांचाही विवाह एकाच दिवशी असल्याने तिन्ही कुटुंबांसह संपूर्ण मित्रमंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
जात-पात विरघळली, मानवता जिंकली!
सायंकाळी सात वाजता तिन्ही नवरदेवांची वरात आपापल्या घरापासून डीजेच्या तालावर घोड्यावरून थाटामाटात निघाली. ही वरात जेव्हा गावातील पोलीस चौकीजवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली, तेव्हा तिथे एक वेगळीच जादू पाहायला मिळाली. इथे कोणताही जातीय भेद उरला नव्हता. बौद्ध, माळी, तेली हा भेद विसरून तिन्ही नवरदेव शिवतीर्थावर एकत्र आले आणि आपल्या मित्रपरिवारासह मनसोक्त नाचले. मित्रांनी तिन्ही नवरदेवांना थेट खांद्यावर उचलून धरले. हा केवळ लग्नाचा सोहळा नसून मानवतेचा आणि सामाजिक सलोख्याचा महाउत्सव होता.
महापुरुषांच्या विचारांना खरी मानवंदना,
तिन्ही नवरदेवांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होताना तिघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. देशात आजही अनेक ठिकाणी दलित-बहुजन समाजाच्या नवरदेवांना घोड्यावर बसू न देणे, मंदिरांमध्ये प्रवेश नाकारणे अशा जातीय मानसिकतेच्या घटना घडत असतात. अशा विषमतावादी मानसिकतेच्या लोकांच्या तोंडावर वडनेर भोलजी येथील सुज्ञ नागरिकांनी आणि तरुणांनी ही एकत्र वरात काढून जोरदार चपराक लगावली आहे.
हा सोहळा म्हणजे राजा शिवछत्रपती, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा खरा महाराष्ट्र असल्याचा प्रत्यय गावकऱ्यांना आला. ही केवळ एक लग्नाची वरात नव्हती, तर देशातील तरुण पिढीने सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले एक खंबीर पाऊल होते, अशी भावना या निमित्ताने सर्वत्र व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments