आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज पोर्टल,
मुख्यसंपादक -
फक्त तापमानच नाही तर हा आहे वणवा…
एप्रिलचा हा नकाशा फक्त तापमान दाखवत नसून तो वास्तवाची जळजळीत जाणीव करून देतो आहे. सध्याचे देशातील तापमान बघितले तर नागपूर ४५°, अहमदाबाद ४४°, प्रयागराज ४३°, दिल्ली ४२°—संपूर्ण देश जणू गडद लाल रंगाच्या तावडीत सापडलेला. ही केवळ उष्णतेची लाट नाही, तर निसर्गाच्या असमतोलाची स्पष्ट हाक आहे.
आश्चर्य म्हणजे, हा अजून उन्हाळ्याचा कळस नाही. मे-जूनचे सर्वात तडाखेबाज दिवस अजून यायचे आहेत, आणि तरीही एप्रिलमध्येच ही असह्य तीव्रता अंगावर येते आहे. गेल्या काही दिवसांत उष्णतेने अक्षरशः जगणं कठीण केलं आहे—रस्ते तापलेले, हवा कोरडी, आणि श्वासही जड वाटणारा हा उन्हाळा आहे.
कधीकाळी हिरव्या सावलीत विसावणारी ही भूमी आज उष्णतेच्या जाळ्यात अडकलेली दिसते. “जंगलं व्यवस्थित आहेत” अशी समजूत घालणाऱ्यांसाठी हा नकाशा एक कठोर प्रश्न बनून उभा आहे—खरंच आपण निसर्गाची काळजी घेतोय का?हा क्षण फक्त तक्रार करण्याचा नाही, तर जगृत होण्याचा आहे. कारण निसर्ग शांतपणे सहन करत नाही—तो उत्तर देतो आहे. आणि आज तो आपल्या तापलेल्या नकाशातून बोलतो आहे.
डोंगर जळतात तेव्हा फक्त झाडं जळत नाहीत, तर निसर्गाचा श्वासच करपतो. त्या आगीत पक्ष्यांची घरटी, प्राण्यांचे आश्रय, आणि असंख्य जीवांची स्वप्नं राख होतात. काही क्षणांची बेफिकिरी, आणि शेकडो वर्षांची जैवविविधता संपून जाते.
आपण समजतो डोंगर जळतोय… पण खरं तर मानवाचं भविष्य जळत असतं. बोडके झालेले डोंगर उद्या आपल्याच विनाशाचे साक्षीदार ठरतील.वेळीच थांबलो नाही, तर वणवा फक्त जंगलात नाही—आपले अस्तित्वातही पेटेल अशी परिस्थिती झाली आहे.
अजुनही वेळ गेलेली नाही. जागे होऊन खरी संपत्ती निसर्गच आहे हे समजून घ्यायची वेळ आली आहे व त्या संपत्तीला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी तर लागणारच आणि तरच आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी समर्थ ठरू शकणार आहे.

Post a Comment
0 Comments