आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
लोणार: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याबरोबरच केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने लोणार येथे भव्य ‘तिरंगा रॅली’ चे आज आयोजन करण्यात आले. कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणारच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने, कै. कमलाबाई क. बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, लोणार तसेच लोणार शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली.
बनमेरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रॅलीचे प्रमुख महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी व सहभागी नागरिकांनी हातात घेतलेला तब्बल १०० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज आहे. या विशाल तिरंग्याच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
या तिरंगा रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच लोणार शहरातील युवा व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झालेल्या युवक-युवतींनी देशभक्तीपर घोषणा देत लोणार शहरातून उत्साहपूर्ण वातावरणात रॅली काढली.
‘वंदे मातरम्’ भारत माता की जय!,जय हिंद!अशा घोषणांनी संपूर्ण लोणार शहराचा परिसर दुमदुमून गेला. रॅली मार्गावर नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी नागरिकांना आपल्या घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकविण्याचे तसेच राष्ट्रध्वजाचा सन्मान व प्रतिष्ठा कायम राखण्याचे आवाहन केले.
"हर घर तिरंगा रॅलीला"लोणारचे तहसीलदार मा. भूषण पाटील यांनी उपस्थित राहून हिरवी झेंडी दाखविली. यावेळी अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष बनमेरू, सामाजिक कार्यकर्ते मा. शुभम बनमेरू, शुभम देसाई, शुभम भगत, विनोद थोरवे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. ‘हर घर तिरंगा’ अभियान हे केवळ राष्ट्रध्वज फडकविण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय अभिमान आणि देशाप्रती कर्तव्याची भावना निर्माण करणारे अभियान ठरावे, असे आवाहन करण्यात आले.
या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कर्तव्य, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचे महत्त्व समजावून देण्यात आले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय मूल्यांची जडणघडण व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विविध सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
शहरातून निघालेल्या या भव्य तिरंगा रॅलीमुळे लोणार शहरातील वातावरण देशभक्तीमय झाले होते. १०० मीटर लांबीच्या तिरंग्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. विविध वयोगटातील नागरिकांनी रॅलीचे स्वागत करून महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच लोणार शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. बनमेरू महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही हर घर तिरंगा रॅली राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ठरली.


Post a Comment
0 Comments