आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -
जालना : जालन्यातल्या अंबड तालुक्यातील नांदी गावात ही घटना घडली आहे. नवरदेवाचा बूट पळवण्यावरून वधू आणि वर पक्षात मोठा राडा झाला आहे. प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण.,
जालन्यातल्या अंबडमध्ये नवरदेवाचा बूट पळवल्यानं दोन गटात राडा झाला आहे.अंबडच्या नांदीमध्ये ही घटना घडली आहे. लग्नातील मारहाण होत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कालचा असल्याचं सांगितलं जातं असलं तरी ही घटना मात्र 3 मे रोजी घडली आहे. नांदी गावात अहिल्यानगर जिल्ह्यातील मुरमी गावच्या लक्ष्मण गायकवाड याचं लग्न नांदी गावातील काजल गिर्हे हिच्या सोबत लागलं होतं. पण लग्नात नवरदेवाचा बूट पळवण्याची परंपरा तशी जुनीच आहे.थट्टा मस्करी म्हणून वधू कडील मंडळी नवरदेवाचा बूट लपवून ठेवतात आणि बूट परत करण्याच्या मोबदल्यात वधूच्या बहिणी नवरदेवाला पैसे मागतात. ही जुनी प्रथा आहे.
लग्नात तुंबळ राडा,
मात्र या लग्नात नवरदेवानं पैसे देणं तर दूरच राहिलं पण नवरदेवाच्या भावाने देखील नवरीचा बूट पळवला आणि वाद वाढला. नवरदेवाचा बूट नवरीकडील मंडळींनी तर नवरीचा बूट नवरदेवाच्या भावाने पळवला।आणि नवरदेवाचा बूट परत करण्याच्या मोबदल्यात नवरीचे बूट परत करण्याची ऑफर दिली. यामुळे दोन गटात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि नंतर दोन्हीही गटात तुंबळ राडा झाला. यात महिलाही मागे राहिल्या नाहीत. त्यामुळे या राड्यात दोन्हीही गटातील महिला जखमी झाल्या. हा वाद नंतर एवढा वाढला की, लग्नात आलेल्या महिलेचे दागिने देखील चोरीला गेल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कुणाला अटक केली नसली तरी पोलिसांनी तपासाअंती अटकेची कारवाई करण्याची तयारी केली आहे.
दोन्ही गटावर गुन्हे दाखल,
नवरदेव आणि नवरीचे लग्नातील बूट पळवण्यावरून नांदीमध्ये घडलेली ही घटना सध्या अंबड तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र केवळ बुटावरून झालेल्या राड्यामुळे चांगल्या लग्नाला गालबोट लागल्यानं हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे. त्यामुळे बूट पळण्याची परंपरा मात्र दोन्हीही गटातील वऱ्हाडी मंडळींच्या गुन्हा दाखल झाल्याने अंगलट आलं हे नक्की.
लग्नात नवरदेवाचे बूट किंवा चप्पल लपवण्याच्या या पद्धतीला 'जुता छुपाई' किंवा 'जुता चोरी' असे म्हटले जाते. या परंपरेची नेमकी सुरुवात कधी झाली याचे ठोस ऐतिहासिक पुरावे नसले, तरी याबद्दल काही रंजक समजुती आणि कथा प्रचलित आहेत. याबाबत रामायण काळातील संदर्भ दिला जातो. काही लोककथांनुसार, ही परंपरा रामायण काळापासून चालत आली आहे. असे म्हटले जाते की श्रीरामाच्या लग्नाच्या वेळीही त्यांची पादत्राणे मजेने चोरली गेली होती. राजपूताना देखील परंपरा आहे. एका जुन्या समजुतीनुसार, ही प्रथा राजपूताना (राजस्थान) भागात सुरू झाली असावी.
पूर्वीच्या काळी नवरदेव लग्नातून पळून जाऊ नये किंवा त्याने जबाबदारीने वागावे, यासाठी त्याचे बूट चोरले जायचे आणि लग्न पूर्ण झाल्यावरच ते परत केले जायचे. फ्रान्समध्ये लग्नाच्या वाहनामागे बूट किंवा डबे बांधण्याची प्रथा होती, ज्याचे रूपांतर कालांतराने विविध संस्कृतींमध्ये 'बूट लपवण्याच्या' खेळात झाले असावे, असेही मानले जाते. ही परंपरा प्रामुख्याने पंजाब आणि उत्तर भारतात जास्त लोकप्रिय होती, जी नंतर बॉलीवूड चित्रपटांमुळे संपूर्ण भारतात आणि जगभरातील भारतीय लग्नांमध्ये प्रसिद्ध झाली. अनेकदा या परंपरांमुळे दोन कुटुंबातील जिव्हाळा आणि प्रेम वाढतं. पण या कुटुंबात मात्र वेगळा अनुभव आला आहे.


Post a Comment
0 Comments